मंचर: नानोली(ता. मावळ) येथील बैलगाडा शर्यतीवरून परतणाऱ्या पिकअपचा टायर फुटल्याने तो पलटी होऊन एक जण ठार झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. आकाश राजू लोणकर (वय 30 रा. शिरापूर ता. पारनेर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. हा अपघात लोणी गावच्या हद्दीत पाबळ ते लोणी रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी झाला आहे.अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह फरार झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानोली येथील बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी दत्ता अशोक चाटे (रा. शिरपूर) यांचा बैलगाडा पिकअप मधून गेला होता. दुपारी बारा वाजता बैलगाडा नानोली येथे पोहोचला. दोन वाजता चाटे यांचा बैलगाडा शर्यतीत सहभागी होऊन दुपारी तीन वाजता नानोली येथून घरी येण्यासाठी निघाले. दत्ता चाटे हा पिकअप वाहन चालवत होता. पिकअप वाहनात बैल व घोडी होती. तर काहीजण गाडीच्या टपावर बसले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणी गावच्या हद्दीत परंपरा हॉटेल समोर पिकअप गाडीचा पाठीमागील टायर फुटला व पिकअप गाडी रस्त्यावर पलटी झाली.
या अपघातात रविंद्र काशिनाथ माळी, लखन माळी, रोशन माळी (सर्व रा. चोंभुत ता. पारनेर) हे जखमी झाले आहेत. वाहनातील इतरही काही जण जखमी झाले आहेत. आकाश राजू लोणकर (रा. शिरापूर ता. पारनेर) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले आहे. अपघातातील एका जखमीला उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. तर तिघांवर मंचर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बैलगाडा तसेच पिकअप मालक दत्ता चाटे याने जखमींना उपचारासाठी न नेता तो पिकअपसह पळून गेला आहे.
स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत केली. रविंद्र काशिनाथ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दत्ता अशोक चाटे (रा. शिरापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर येथे अपघातातील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य रवींद्र करजखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे आदी होते. अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आढळराव-पाटील यांनी दिली आहे.