पिंपरी : अज्ञात मुलासोबत व्हॉटसॲपवर चॅटिंग करून मुलगी चुकीचे वागली. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवत आहोत. कोणालाही दोषी न धरता आमचा अंत्यविधी एकत्रच करावा, अशी चिठ्ठी लिहून पित्याने पोटच्या दोन मुलींच्या अंगावरून ट्रक चालवून स्वत: ट्रकखाली आत्महत्या केली. मावळ तालुक्यातील इंदोरी गावात रविवारी (दि. १८) ही धक्कादायक घटना घडली.
नंदिनी भरत भराटे (वय १८), वैष्णवी भरत भराटे (वय १४), भरत ज्ञानदेव भराटे (वय ४०, सर्व रा. इंदोरी), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मुलींची आई सपना भरत भराटे (वय ३६) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत याच्याकडे एक ट्रक होता. तसेच त्याची पत्नी सपना एका कंपनीत नोकरी करतात. मुलगी नंदिनी ही तिच्या मोबाईलच्या व्हाट्सअँपवर कोणत्या तरी मुलाशी चॅटिंग करत होती. याचा राग अनावर झाल्याने भरतने नंदिनी व वैष्णवी या दोन्ही मुलींना शनिवारी दमदाटी केली. पत्नी कंपनीतून घरी आल्यानंतर मुलींनी घडलेला प्रकार सांगितला. भरतने एक चिठ्ठी लिहिली. चिठ्ठीत काय लिहिले आहे, याबाबत भरतने पत्नीला सांगितले नाही.
घरातील सर्व जण शनिवारी रात्री जेवण करून झोपले. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास दोन्ही मुलींना दमदाटी करून भरत याने रस्त्यावर झोपवले व ट्रक सुरू केला. ट्रकच्या आवाजामुळे जाग आल्याने त्यांच्या पत्नी घराबाहेर आल्या. त्यावेळी दोन्ही मुली घरासमोरील रस्त्यावर झोपल्या असल्याचे त्यांना दिसले. भरत याने मुलींच्या अंगावरून ट्रक चालवला. ट्रक चालू स्थितीत असताना ट्रकमधून उडी मारून स्वतः ट्रकच्या समोर झोपून भरत याने आत्महत्या केली.
कोणालाही दोषी धरू नये.
भरत याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. मुलगी चुकीची वागते. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवत आहोत. त्यासाठी कोणालाही दोषी धरण्यात येऊ नये. आमचा अंत्यविधी एकत्र करण्यात यावा, असे त्या चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे.