पिरंगुट: मुळशी तालुक्यातील उरवड जवळील गाडेवाडी येथे खाजगी मालकीच्या खाणीतील पाण्यात मासे पकडण्यासाठी एक युवक आपल्या भावासोबत गेला होता. तेव्हा खाणीच्या कठड्यावरून पाण्यामध्ये पडला असता त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लहू मधू वाघमारे (वय ३२ रा. गाडेवाडी ) असे या युवकाचे नाव असून तो आपल्या भावासह गाडेवाडी येथील खाणीच्या कठड्यावर बसून पाण्यामध्ये दुपारच्या वेळेस मासे पकडत होता. तेव्हा उन्हामुळे फिट आली असावी असा त्याच्या भावाने अंदाज लावला आहे. त्यानंतर दगडावर पडल्याने त्याला मार लागला असावा. त्यामुळे पोहता येत असूनही पाण्यात बुडाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती युवकाची आई धोंडाबाई वाघमारे व त्याच्या नातेवाईकांनी पौडपोलिसांना दिली. पौडपोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु खाणीतील पाणी खोल असल्याने हा युवक सापडला नाही. अंधार पडल्याने हे शोध कार्य थांबविण्यात आले
तेव्हा पोलिसांच्या वतीने दुसऱ्या दिवशी मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या टीमला पाचारण करण्यात आले. तेव्हा मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने सकाळीच साडेसात वाजण्याच्या सुमारास येत या युवकाच्या शोधमोहिमेला सुरुवात केली. तेव्हा या टीमने जवळपास दोन ते तीन तास शोध मोहीम राबवून या युवकाचा मृतदेह शोधून काढला. तेव्हा तो मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून त्याचा पंचनामा करून पुढील कार्यासाठी तो ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला.