पुणे : भरधाव कॅबची धडक बसून अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी महिला पोलिस अंमलदार अश्विनी कांबळे यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कॅब चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० असून, अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना ३ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली.
अधिक माहितीनुसार, खडकी बाजार येथील अष्टविनायक गणेश मंदिर चौक येथून भरधाव निघालेल्या कॅब चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या अज्ञात पादचाऱ्याला जोराची धडक दिली. कॅबचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता निघून गेला. यात गंभीर दुखापत होऊन पादचाऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कॅबची माहिती मिळविण्याचे काम खडकी पोलिस करत आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक आनंद रुईकर करत आहेत.