पुणे : हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या व त्यांचा एन्काऊंटर करा, अशी धमकी देणारे पत्र त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. शिवाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी हे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांचे भाऊ डॉ. गजानन एकबोटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केली असून सध्या येरवडा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. एकबोटे यांना धमकीचे आलेले हे दुसरे पत्र असून यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये असेच एक पत्र आले होते. याबाबत प्रो. ए. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी सांगितले की, चार पोस्टकार्ड एकत्र करुन एक पत्र तयार केले आहे. त्याला एका इंग्रजी वृत्तपत्राचे कात्रण जोडून त्यावर हाताने संपूर्ण एकबोटे फॅमिलीला तोफांच्या तोंडी द्या आणि एन्काऊंटर करा, असा मजकूर लिहिलेला आहे. या पत्राची दखल घेऊन डॉ. एकबोटे यांनी गुरुवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात आणताना एका तरुणाने त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणासह त्याच्या अन्य दोन सहका-यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेला १५ दिवस होत नाही तोपर्यंत हे धमकीचे पत्र आले असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही फेब्रुवारीमध्ये असेच एक धमकीचे पत्र आले होते. या विषयी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सांगितले की, फेब्रवारी महिन्यातही पोस्टाने अशाच प्रकारचे पत्र आले होते. पण, त्यावेळी आम्ही मिलिंद एकबोटे यांच्या जामीनाच्या प्रयत्नात असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. न्यायालयात शाई फेकीचा प्रकार घडल्याने या पत्राची आम्ही गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची पोलिसांनी आता दखल घेतली असून त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस सरंक्षण देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.