पुणे : राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्ये दिली आहेत. उद्याचा भारत कसा असेल याची उत्तरे त्यात सापडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यघटना माझा धर्म आहे असे सांगतात मग मनुस्मृती फेकून द्या असे का सांगत नाहीत? असा खडा सवाल ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी उपस्थित केला. एकविसाव्या शतकात एका काखेत राज्यघटना आणि एकात मनुस्मृती असा प्रवास करता येणार नाही. आपल्या देशाने अजूनही निर्णय घेतलेला नाही की काय फेकायचे आणि काय ठेवायचे? म्हणूनच आजचा गोंधळ आहे अशा शब्दातं त्यांनी सरकारच्या दुट्ट्पीपणावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त दाभोलकर यांच्या भ्रम और निरास या हिंदी अनुवादित पुस्तकाच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रा. चंदा काशिद आणि प्रा. गिरीश काशिद उपस्थित होते. देशात अराजकताहीन स्थिती आहे. कुणीही चार टाळक्यांनी उठाव आणि कुणालाही मारावे. हिंदुत्ववाद्यांकडे शस्त्रसाठे सापडत आहेत. उद्या हे सरकार गेले आणि जर धर्मनिरपेक्ष सरकार आले तर त्या सरकारच्या अडचणी वाढविण्याचे उद्योग या शस्त्रसाठ्यामधून सुरू आहेत असा आरोपही कसबे यांनी केला. ते म्हणाले, जर देशात अराजकता आली तर जातीयुद्ध होईल, त्या आधारावर सरकार येईल. या कपोल्कपित गोष्टी नाहीत. स्वातंत्र्यचळवळीला त्यांचा विरोध होता कारण गांधीजीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले तर देश लोकहितवादी आणि धर्मनिरपेक्ष होईल. गांधीजींना मारून जी अराजकता निर्माण होईल त्यासाठीही शस्त्रसाठे होते, अशी कबुली आरआरएसच्या एका मेळाव्यात पुढा-याने सांगितले होते. गांधी इतके महान नेते होते की म्हणावा तेवढा असंतोष पसरला नाही. गांधी आणि नेहरू यांच्याकडे नैतिकता होती एक आदरयुक्त भीती मनामध्ये होती. आता देशाला लढावे लागणार आहे ते सांस्कृतिक राष्ट्रवादाशी. हिंदूराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. आपला राष्ट्रवाद मानवी, निरपेक्ष, विवेकी आहे. कम्युनिस्टांनी टिळकांची परंपरा स्वीकारली तिथेच डावी चळवळ संपली. फुलेंचा वारसा घेतला असता तर आपण सत्ताधारी असतो. गांधीही हिंदुत्ववादी होते पण त्यांचे हिंदुत्व वेगळे होते. कठोरातली कठोर धर्म चिकित्सा करणे हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. आधुनिकतेचा विचार म्हणजे विवेकवादाचा विचार आहे. बुद्धिवादी, विवेकवादी व्हायचे असेल तर आधी माणूस समजून घ्यावा लागेल. माणूस अंधश्रद्धाळू का होतो? आपण आलो कुठून , जगायच कुणासाठी, स्वत:साठी की समाजासाठी? अशा प्रश्नात माणूस अडकून पडतो. आपली निर्मिती ईश्वराने केली हे धर्माने सांगितले आहे. हिंदू धर्मात माणसाच्या निर्मितीची सूत्रबद्ध माहिती नाही. तो समाजाला, वर्ण व्यवस्थेला माहिती देतो. वेद व्यक्तीला महत्त्व देत नाही. माणूस समजून सांगा अस दाभोलकर सांगायचे. मी सर्व धर्मांची चिकित्सा केली पण इस्लामची चिकित्सा केली नाही याचे वाईट वाटते.अंधश्रद्धेचा प्रश्न केवळ धर्माशी नाही तर मानवी जीवनाशी निगडित प्रश्न आहे. सध्या उजवीकडील राजकारण वाढत आहे. कारण इस्लामबद्दल एक कोपरा आहे. समान नागरी कायदा येत नाही तोपर्यंत धर्मांमध्ये भेद राहणारच.सर्व पुरोगामी संघटनांनी समान नागरी कायद्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येक धर्मात काय आहे याचीच चर्चा सुरू आहे. इतर धर्मांनी विकासासाठी त्यांच्या क्रमात बदल केले ते मुस्लिमांनाही करावे लागतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यघटना आणि मनुस्मृती असा एकत्रित प्रवास अशक्य : डॉ. रावसाहेब कसबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 8:12 PM
आता देशाला लढावे लागणार आहे ते सांस्कृतिक राष्ट्रवादाशी. हिंदूराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे : रावसाहेब कसबे
ठळक मुद्देइतर धर्मांनी विकासासाठी त्यांच्या क्रमात बदल केले ते मुस्लिमांनाही करावे लागणारडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम और निरास या हिंदी अनुवादित पुस्तकाच्या लोकार्पण समारंभ