पुणे : राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते जाणून घेण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या कलचाचणीचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच गणवेशधारी सेवांकडे (१७.८३ टक्के) विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर दरवर्षी हिट ठरणाऱ्या ललित कला (१८.१७ टक्के) व वाणिज्य शाखांमध्ये (१६.१७ टक्के) करिअर करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा अहवाल यंदा खूपच लवकर परीक्षा सुरू असतानाच जाहीर करण्यात आला आहे. त्यांना शनिवार, दि. १६ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता महाकरिअरमित्रा डॉट इन या वेबसाईटवर हा अहवाल उपलब्ध होणार आहे. राज्यभरातील २२ हजार ११२ शाळांमधील दहावीच्या १६ लाख १३ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली होती. महाविद्यालयात प्रवेश करताना त्यांना शैक्षणिक भविष्याची दिशा निश्चित करता यावी, या हेतूने २०१६ पासून राज्य मंडळाकडून दहावीला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जात आहे.दरवर्षी ललित कला, वाणिज्य शाखांमध्ये करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत होते. यंदा त्यामध्ये एक मोठा बदल दिसून येत असून गणवेशधारी सेवांकडे (पोलीस, लष्कर, निमलष्करी दल) विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. ललित शाखांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांची संख्या सर्वाधिकच आहे. मात्र, गणवेशधारी सेवांकडे वाढलेला कल यंदा लक्षणीय आहे. गणवेशधारी सेवेत जाऊ इच्छिणाºयांची संख्या यंदा १७.८३ टक्के इतकी आहे. ललित शाखेकडे १८.१७ टक्के, वाणिज्य शाखांकडे १६.९९ टक्के, कृषीक्षेत्राकडे १४.११ टक्के, कला व मानव्यविद्या शाखेकडे १३.४१ टक्के, आरोग्य व जैविक विज्ञान शाखोकडे ११.२४ टक्के, तांत्रिक शाखांकडे ९.०६ टक्के विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे.विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्ड क्रमांकाच्या आधारे त्यांचा कल चाचणी अहवाल महाकरिअरमित्रा या पोर्टलवरून आॅनलाइन प्राप्त करू शकतात. त्याचबरोबर त्यांचा कल असलेल्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ त्यांना पाहता येऊ शकणार आहे.प्रत्येक क्षेत्रनिहाय माहितीपर व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या कलक्षेत्रानुसार त्यांच्या जिल्ह्यातील उपलब्ध अभ्यासक्रमांचा शोध विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे घेता येणार आहे. या ठिकाणी ८० हजारांहून अधिक शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना आज मिळणार अहवालदहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा कलचाचणी अहवाल आज (शनिवार, दि. १६ मार्च २०१९ रोजी) सकाळी ११ वाजता महाकरिअरमित्रा डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्ड क्रमांकाच्या आधारे हा अहवाल प्राप्त करू शकतात.
गणवेशधारी सेवांकडे वाढला कल; दहावीच्या विद्यार्थ्यांचा कलचाचणी अहवाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:24 AM