शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांशी सर्व गावांमध्ये हिंसक जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. विशेषतः बिबट्या, तरस, लांडगा व रानडुकरांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अनेक घटनांमधून निदर्शनास येत आहे. मात्र, दुर्दैवाने या भागातील गावांमध्ये दिवसा विजेचे भारनियमन केले जात असून रात्रीच्या वेळी शेतपंपाची वीज दिली जात आहे. त्यामुळे पिकांचे सिंचन करण्यासाठी नाईलाजाने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडून जीव धोक्यात घालावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने भारनियमनाची वेळ बदलून दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या वीज वितरण कंपनीने मान्य केल्या नाहीत, तर याविरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शेलगाव (ता.खेड) येथील भैरवनाथ महाराज मंदिरात शेतकरी संघटनेची विशेष बैठक पार पडली. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वास्तज दौंडकर, तालुकाध्यक्ष सुभाष पवळे, युवाध्यक्ष सुनील पोटवडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, कैलास बवले, आप्पासाहेब दिघे, एकनाथ आवटे, परसराम खैरे, रामचंद्र साबळे, बबनराव दौंडकर, बबनराव पवळे, संतोष खलाटे, भरत आरगडे, जालिंदर बवले, विठ्ठल आरगडे, रामदास बवले, शंकर बवले, दत्ता दरेकर, संतोष सरवदे, मंगेशघेनंद, विक्रम घेनंद आदिंसह अन्य शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, रात्रीच्या वेळी बिबट्याचा तसेच अन्य जंगली प्राण्यांचा मानवीवस्तीत होत असलेला शिरकाव नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरत आहे. त्यातच खरपुडी गावात पाच दिवसांपूर्वी भरदिवसा तरसाने माणसावर हल्ला चढविल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर वीजपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेर पडावे लागत आहे. अशावेळी प्राण्यांचा धोका संभवतो असल्याने दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे.
०९ शेलपिंपळगाव
शेलगाव येथे शेतकरी संघटनेच्या विशेष बैठकीत दिवसाचे भारनियमन रद्द करण्याची मागणी करण्यात आली.