पुणे : देशाचा विकास व्हायचा असेल तर कृषी क्षेत्राला मजबूत करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे. कृषीचा विकास व्हायला हवा. त्यामुळेच शेतकरी समृध्द होईल. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने शेती केली पाहिजे. फलोत्पादन करणे ही आजची गरज आहे. त्याने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. उत्पादन वाढल्यास निर्यातही करता येईल. शेतीच्या मालाला पीक काढण्यापूर्वी चांगला भाव मिळेल, अशी सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मंगळवारी (१ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यात फलोत्पादन पिकांमधील मुल्य साखळी वृध्दी-क्षमता या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन वैंकुठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत त्यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, केंद्र सरकारच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन, मनोज आहुजा, एकनाथ ढोले आदी उपस्थित होते.
फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. सेंद्रीय मूल्य साखळीवर आधारित, फलोत्पादन क्षेत्रातील यशोगाथांचे संकलन असणाऱ्या 'ऑरगॅनिक पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टीस फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप्स' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशनही कृषीमंत्र्यांच्या हस्ते झाले.
आता प्रत्येकाला वाटतं शेती करावी
काही वर्षांपूर्वी इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर व्हावा, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक व्हावा, पण शेतकऱ्याला वाटत नव्हते की, त्याचा मुलगा शेतकरी व्हावा. पण आता हे चित्र बदलले आहे. उच्च शिक्षण घेतलेले लोकही आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करू पाहत आहेत. प्रत्येकाला वाटत आहे की, माझ्याकडे शेती असावी आणि ती करावी, हे चित्र आशादायक आहे, असे नरेंद्र तोमर म्हणाले.
पावसावर कोणाचे नियंत्रण नसते. हवामान बदलामुळे अतिवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकार पंचनामे करत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल.- नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री
सध्या रासायनिक शेती खूप वाढली आहे. त्यापासून फळांचे उत्पादन वाढले. या रासायनिकमुळे अनेकांना कॅन्सर होत आहे. तो होऊ नये म्हणून आता सेंद्रीय पध्दतीने फळांची निर्मिती होत आहे. असे प्रयोग देशभर गेले पाहिजेत.- अब्दुल सत्तार, कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य