पुणे : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा पुणे दौऱ्यावर येत आहेत. १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस ते पुण्यात असतील. दोन जाहीर कार्यक्रमांशिवाय त्यांचा दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. मात्र ते कसबा विधानसभा पोटनिवडणूक सुरू असताना येत असल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या नन्हे आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एका पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन असे दोन कार्यक्रम शहा यांच्या हस्ते होणार आहेत. याच कार्यक्रमांसाठी म्हणून शहा १९ व २० डिसेंबर २०२२ मध्ये पुण्यात येणार होते. त्याही वेळी त्यांनी या दोन कार्यक्रमांशिवाय पुण्यात अन्य कार्यक्रम स्वीकारलेले नव्हते. भाजप शहर शाखेलाही त्याबाबत पक्षीय स्तरावर काहीच कळवण्यात आलेले नव्हते.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने त्या कार्यक्रमाची तयारीही केली होती. मात्र त्यावेळी अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. प्रतिष्ठानचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते त्यामुळे बरेच नाराज झाले होते. आता नुकताच त्यांचा नवा दौरा याच दोन कार्यक्रमांसाठी जाहीर झाला आहे. मात्र तो पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने चर्चेत आला आहे. पण निवडणुकीशी संबंधित एकही कार्यक्रम त्यांनी घेतलेला नाही, तसे पक्षाने कळविलेले नाही, असे पक्षाच्या शहर शाखेच्यावतीने सांगण्यात आले.