पुणे : बॅले नृत्य, संगीत मैफल अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी यंदाचा 34 वा पुणे फेस्टिवल . शुक्रवारपासून (दि.2) रंगणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे फेस्टिव्हलचे उदघाटन होणार आहे. महोत्सवाला अभिनेते सुनील शेट्टी हे उपस्थित राहणार असून, दिवंगत उद्योगपती राहुल बजाज यांना फेस्टिवल अर्पण करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी उदघाटन कार्यक्रमात गणेश वंदना सादर करतील. तसेच, दुसर्या दिवशी त्या ‘गंगा’ बॅले नृत्य सादर करतील, अशी माहिती फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
फेस्टिवलमध्ये यंदा ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पं. शिवकुमार शर्मा, यांना विविध कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. तसेच, ऑल इंडिया मुशायरा, अशोक हांडे यांचा ‘आजादी 75 - आजादी का अमृत महोत्सव’, राहुल देशपांडे यांची संगीत मैफल, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहे. हे कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे होतील. तर बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. फेस्टिव्हलच्या गणरायाची प्रतिष्ठापना बुधवारी (दि.31) सकाळी 10 वाजता नेहरू स्टेडिअममधील हॉटेल सारस येथे होणार आहे. यंदा फेस्टिवलमध्ये सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर ज्येष्ठ विधिज्ज्ञ एस. के. जैन, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, डॉ. भूषण पटवर्धन, गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना पुणे फेस्टिवल अॅवार्ड देऊन गौरविले जाणार आहे.