बारामती (पुणे) : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथील भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प शनिवारी (दि. ११) सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली.
यावेळी एम्ब्रियो ट्रान्सफर लॅबोरेटरीचे उद्घाटनदेखील होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र हा देशी गोवंश आणि म्हैस यामधील दूध उत्पादनवाढीचा उद्देश घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजना व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेला प्रकल्प आहे. आज भारत जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे. मात्र, सरासरी भारतीय गायीचे दूध देण्याचे प्रमाण प्रतिदिन प्रति गाय ६ ते ८ लिटर एवढेच आहे. भविष्यकाळामध्ये भारतासमोर अन्नाची समस्या निर्माण होणार आहे. मानवाच्या अन्नामध्ये प्रथिनासाठी दूध हा प्रमुख स्रोत मानला जातो. त्यामुळे सद्य परिस्थितीत संकरित गायीसोबतच देशी गाय आणि म्हशीमधील दुधाचे उत्पादन वाढवणे गरजेचे ठरते.
देशी गोवंशाचे दूध वाढवण्याच्या उत्पादनातील समस्येची काही कारणे आहेत. त्या सर्व समस्या या प्रकल्पाच्या माध्यमातून दूर होणार आहेत. चांगल्या दुधाळ जनावरांची निर्मिती करण्यासाठी दर्जेदार अशा कृत्रिम रेतन व एम्ब्रियो ट्रान्सफर या सुविधांची साखळी निर्माण करणे. देशी गोवंश आणि संकरित जनावरांच्या पुनरुत्पादनासाठी उच्च उत्पादकतेची वंशावळ असणाऱ्या वळूंच्या वीर्यमात्रांचा पुरवठा करणे, यासाठी प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीकरिता नेदरलँडचे तज्ज्ञ, व्हॅन हॉल लॉरेन्स्टाईन, वॉखानिंगण विद्यापीठ आणि डच कंपन्या यांची मदत झाली. ज्ञान आणि कौशल्य हे दुग्ध व्यावसायिक, शेतकरी, महिला, नवीन उद्योजक, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन संबंधित कंपन्यांतील तज्ज्ञ यांना आत्मसात करता येईल, असे मत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे व प्रकल्पप्रमुख डॉ. धनंजय भोईटे यांनी व्यक्त केले.
...भारतीय गीर वासरांची निर्मिती करण्याचे काम चालू
पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र या प्रकल्पामध्ये देशी गोवंशामध्ये गीर आणि साहिवाल यासोबतच म्हशींमध्ये मुऱ्हा आणि पंढरपुरी या दोन म्हशींच्या जातींचा समावेश केला गेला आहे. या प्रकल्पात सध्या एम्ब्रियो ट्रान्सफरमार्फत ब्राझिलियन आणि भारतीय गीर वासरांची निर्मिती करण्याचे काम चालू केले गेले आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांनी दिली.
...गडकरींच्या दौऱ्याकडे बारामतीकरांचे लक्ष
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आदराचे स्थान आहे. गडकरी राजकारण न करता विकासकामांवर लक्ष केंद्रित करतात, अशी बारामतीकरांची कायम चर्चा असते. गडकरी यांच्याच पुढाकारातून सुरू असलेले या भागातील पालखी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मागील वर्षी याच काळात गडकरींनी बारामतीकरांना ७७८ कोटींचे घसघशीत गिफ्ट दिले आहे. उंडवडी क.प. ते बारामती शहरातील देशमुख चौक आणि ढवाण चौक ते फलटणपर्यंत दोन रस्त्यांसाठी गडकरींनी हा निधी मंजूर केला आहे. आता या भेटीत गडकरी बारामतीकरांसाठी नव्याने कोणती मागणी होणार आणि गडकरी काय गिफ्ट देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.