पुणे- इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसेस नंतर, आता आपण लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractors) आणि इलेक्ट्रिक ट्रक लाँच करणार आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात राज्यस्तरीय साखर परिषद 2022 (State-level sugar conference 2022) ला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पर्यायी इंधनाचा वापर आणि महागाईच्या युगात त्याचे महत्त्वही यावरही भाष्य केले.
पर्यायी इंधन उर्जेचे नवीन भविष्य -या राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute, Pune) यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरावर भर दिला. गडकरी म्हणाले, इथेनॉलचा वापर शेती आणि उपकरणांमध्ये कशा पद्धतीने करता येईल, याचा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नाही, तर पर्यायी इंधन हे ऊर्जेचे नवे भविष्य असल्याचेही ते म्हणाले.
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढतेय - केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, इथेनॉल आणि मिथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांसोबतच इलेक्ट्रिक, हेही भविष्य आहे. मला चांगले आठवते, की 3 वर्षांपूर्वी मी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोलत होतो, तेव्हा लोक मला अनेक प्रश्न विचारायचे. पण आता बघा, इलेक्ट्रिक-वाहनांना प्रचंड मागणी आहे आणि ती झपाट्याने वाढत आहे. एवढेच नाही, तर कार आणि बसेसनंतर आता आपण लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रकही लाँच करणार आहोत, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.