पुणे : हिंगणे खुर्द परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी शनिवारचा दिवस थोडा आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. सकाळपासूनच परिसरात पुणे महानगर पालिकेच्या गाड्या फिरत होत्या. सफाई कामगारांकडून जोरदार स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. कधी नव्हे एवढी तत्परता पाहायला मिळाल्यामुळे नागरिकांना सुखद धक्का तर होताच त्याहून नेमकं या पाठीमागं नेमकं कारण काय याबाबत कुतुहूल निर्माण झाले होते. पण काही कालावधीनंतर हिंगणे खुर्द परिसरात केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी येणार असल्याची नागरिकांच्या कानावर पडली. आणि महापालिकेच्या या स्वच्छता मोहिमेपाठीमागची 'राज की बात' समोर आली.
नितीन गडकरी हे शनिवारी पुणे दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात त्यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामासंबंधी पाहणी करण्यात येणार आहे. याचवेळी शनिवारी सकाळी गडकरी हे शनिवारी ( दि. १३) हिंगणे खुर्दच्या गल्लीतील अरविंद कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या जवळच्या लोकांना भेटायला येत आहेत.त्यामुळे गल्लीत वाहतूक पोलिसांची गाडी फिरत आहे.महापालिका कर्मचाऱ्यांची स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. नितीन गडकरी येणार असल्याने या परिसरात सकाळपासूनच स्वच्छता मोहीम सुरु झाली आहे. एरवी फारशी स्वच्छता होत नसल्याने लोकांसाठी हा सुखद धक्का आहे. अर्थात नेहमीच अशी स्वच्छता का राखली जात नाही असाही सवाल नागरिक विचारत आहेत.