नीरा : राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागात सध्या लग्नसराई जोमात सुरू आहे. मात्र, सध्या एका लग्नसोहळ्याच्या भन्नाट ‘आधार’ लग्नपत्रिकेची कुतूहलाने जोरदार चर्चा सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा शहरासारख्या ग्रामीण भागातील प्रमोद आणि विजया गवळी या दाम्पत्याने आपली मुलगी डॉ. रिंचल हिच्या लग्नसोहळ्याच्या लग्नपत्रिकेचे मुखपृष्ठ हे आधार कार्डसारखे छापले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यासह मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नगर यांसारखी शहरे आणि राज्याच्या ग्रामीण भागासह गुजरात, कर्नाटक राज्यातदेखील नव्या कल्पकतेच्या ‘आधार’लग्नपत्रिकेची कुतूहलाने चर्चा होत आहे. गवळी कुटुंबाने आपल्या मुलीच्या लग्नसोहळ्याच्या पत्रिका नुकत्याच नातेवाईक, पाहुणे-रावळे यांच्यासह आप्तेष्ट मित्रमंडळींना वितरित केल्या आहेत. लग्नपत्रिका वितरित करताना प्रथमदर्शी पाहिल्यावर गवळी कुटुंबाला अनेकांनी कोणाचे आधारकार्ड आणले? असा सवाल केला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात युनिक आयडी म्हणून आधारकार्ड रुजले आहे. गवळी कुटुंबाने काढलेली लग्नपत्रिका हीदेखील अगदी हुबेहूब आधारकार्डचे स्वरूप असणारी आहे.लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर आधारकार्डच्या लोगोखाली शुभमंगल तर फोटोच्या जागी वधूवरांचा फोटो छापण्यात आला आहे. लग्न सोहळ्याची तारीख ही आधार नंबरप्रमाणे अनोख्या स्वरूपात मुद्रित करण्यात आली आहे. सोशल मीडियातदेखील आधारकार्ड स्वरूपातील ही लग्नपत्रिका कौतुकाचा विषय बनली आहे. फेसबुकवर या लग्नपत्रिकेला ५ हजारांहून अधिक लाईक मिळाल्याची माहिती वधूची आई विजया गवळी यांनी दिली.
दोन जिवांना जोडणारी अनोखी ‘आधार’ पत्रिका
By admin | Published: February 25, 2016 4:05 AM