कदमवाकवस्ती : मी जनतेचा दुश्मन आहे.मी प्रशासनाचे नियम तोडले आहे.कोरोना माझे काही करू शकत नाही.कारण मी गाढव आहे.या मजकुरासह गाढवाचा फोटो असलेले फ्लॅक्स कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील प्रत्येक चौकात लावण्यात आलेले आहेत.संचारबंदीचे नियम मोडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना याठिकाणी थांबवून त्यांचा गाढवाच्या फ्लॅक्स जवळ फोटो काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे.या आगळ्यावेगळ्या कारवाई मुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या युवकांना आळा बसायला लागला आहे.तर पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्पेशल कमांडोची तुकडी ही लोणी काळभोर परिसरात दाखल झाल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने आता परिसरात संचारबंदी करीता आपली कंबर कसलेली आहे असे दिसून येत आहे.कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या रोज वाढत आहे. जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीची उपाय म्हणून हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचा परिसर काल शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात येत असल्याचा उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी एका पत्राद्वारे आदेश काढला त्यानुसार ग्रामपंचायत व लोणी काळभोर पोलीस प्रशासन यांनी एक बैठक घेऊन चर्चा करून त्यानुसार अंमलबजावणी सुरू केलेली आहे. ही गावं केंद्र बिंदू मानून तीन किलोमीटरचा परिसर बफर झोन (प्रतिबंधित क्षेत्र) करण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जाणाऱ्यांनी प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अनोखी कारवाई; गाढवासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसिध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 1:39 PM
आगळ्यावेगळ्या कारवाई मुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या युवकांना आळा
ठळक मुद्देपुणे ग्रामीण पोलीस दलातील स्पेशल कमांडोची तुकडी ही लोणी काळभोर परिसरात दाखल