बारामती : महावितरणच्या सक्तीने वीजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. देऊळगाव रसाळ( ता. बारामती ) येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः विद्युत रोहित्र वरून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत जोडून देत, ' कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नही देंगे' या आंदोलनास सुरुवात केली आहे.
शेतकरी संघटनेच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतदार संघात शेतकरी संघटनेने कथीत विजबील संदर्भात हे आंदोलन सुरू केले आहे. देऊळगाव रसाळ येथील शेतकऱ्यांना वीजबिल न भरु देता स्व:ता रोहीत्रावर चढून विजपुरवठा सुरळीत केला. शेतकरी महावितरणचे देणे लागत नाही. कृषी पंप वीज बिलापोटी महावितरण राज्य शासनाकडून अनुदान घेते. तसेच शेतकर्यांकडून देखील सक्तीने वीज बिलाची वसुली करते. शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वीजबिल धरले जात नाही. असे असताना बेकायदेशीरपणे महावितरण वीज बिलाची वसुली करत आहे, असा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.
तसेच गावांमध्ये शेतकरी संघटनेची शाखा उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव नांदखिले, राज्य प्रवक्ते अशोकराव खलाटे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हनुमंत वीर इत्यादी उपस्थित होते. यावेळी बारामती तालुका शेतकरी संघटना अध्यक्षपदी पंढरीनाथ रसाळ यांची निवड करण्यात आली.