बारामती : निमगाव केतकी येथे शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्या निषेधार्थ खताच्या पिशवीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी (दि. १९) अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची तालुक्यात चर्चा होती. तर रासायनिक खताच्या किंमती तातडीने कमी कराव्यात अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी बोलताना शेतकरी सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीकांत करे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करू म्हणत सत्तेवर आलेले केंद्र सरकार प्रत्यक्षात रासायनिक खतांची दरवाढ, इंधन दरवाढ, किटकनाशकांची दरवाढ, बियाण्याची दरवाढ सातत्याने करत आहे. सरकारने उत्पादन नव्हे तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुप्पट केला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.
एकेकाळी भारतामध्ये अन्नधान्याची प्रचंड टंचाई त्यामुळे उपासमार होत होती. त्यामुळे देशात प्रचंड प्रमाणात अन्नधान्याची आयात होत होती. रासायनिक खतांची आणि बियाणांमुळे आपण अन्नधान्यात सक्षम झालो. परंतु आता रासायनिक खतांच्या किंमती सरकारने प्रचंड प्रमाणात वाढवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. याचा निषेध म्हणून निमगाव केतकी येथे शेतकरी सुकानु समिती पुणे जिल्ह्याच्या व समस्त शेतकरी वर्ग यांच्या वतीने गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी केली.