पुणे : घराच्या दरवाज्याच्या कोपऱ्यात, झाडांवर किंवा सोसायटींमधील एका भिंतीवर मधमाशांचे पोळे लागलेले दिसले, की ते पोळे जाळून टाकणे किंवा पेस्ट कंट्रोल करून मधमाश्या मारून टाकण्याचा पर्याय निवडला जातो. परंतु ‘मध हवाय पण मधमाश्या नको’ ही वृत्तीच चुकीची असल्याचे जाणवल्याने पुण्यातील आयटीमधल्या मेकॅनिकल इंजिनिअर तरूणाने मधमाशा संवर्धन मोहीम सुरू केली आहे. मधमाश्या हाताळण्याचे विशिष्ट तंत्र आत्मसात करीत पोळ्यांमधील मधमाश्या वाचवून त्यांचे इतर जागी पुनर्वसन करण्याचे काम हा पुण्याचा ‘बी मॅन’ करीत असून, या मोहिमेला राज्यासह देशभरातून चांगला प्रतिसाद मिळ्त आहे. मधमाशांच्या संवर्धन मोहिमेमुळे अल्पावधीतच अमित गोडसे या तरूणाची ‘बी मॅन’अशी एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. आयटी इंजिनिअरपासून ते बी मॅन पर्यंतचा त्याचा हा प्रवास तितकाच रंजक आहे. वारजे येथील निवासी सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोल करून मधमाश्यांचे पोळे जाळल्यानंतर सगळ्या मधमाश्या जमिनीवर मरून पडल्याचे पाहिल्यानंतर त्याला वाईट वाटले. ‘मध पाहिजे पण मधमाश्या नकोत’ ही वृत्ती पाहून तो अस्वस्थ झाला आणि तेव्हाच या मधमाशांना वाचविण्यासाठी काही करता येईल का याचा त्याने ध्यास घेतला. सेंट्रल बी रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसह आदिवासी जमाती आणि शेतकऱ्यांकडून त्याने मधमाशा हाताळण्याचे रितसर प्रशिक्षण घेतले. भारतातील विविध भागात फिरून त्याने मधमाशा समजून घेण्यासाठीची तंत्र आत्मसात केली. मधमाशांच्या पाच प्रजाती असून, कुठल्या प्रजाती कुठल्या भागात पाहायला मिळतात याचा त्याने अभ्यास केला. त्यानंतर त्याने मधमाशा संवर्धनाची मोहीम हाती घेतली. पाच जणांच्या टीमसमवेत ‘बी बास्केट एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनीही त्याने स्थापनाही केली. मोहिमेच्या माध्यमातून करीत असलेल्या जनजागृतीमुळे मधमाशा वाचविण्याची एक मानसिकता समाजात निर्माण होऊ लागली आहे. आज घर, बाग किंवा सोसायट्यांमध्ये कुठेही मधमाशांची पोळी तयार झाली की त्याला हात न लावता या मधमाशा वाचविण्यासाठी त्याला दूरध्वनी करून बोलावले जाते. हेच त्याच्या कामाचे यश म्हणावे लागेल.
मधमाशांच्या प्रजातीनुसार हाताळले जाते तंत्रसाधारणपणे मधमाशांच्या पाच प्रजाती पाहायला मिळतात. त्या प्रजातीनुसार त्यांना हाताळण्याच्या तंत्राचा उपयोग केला जातो. जसे ट्रायगोना जातीच्या मधमाश्या अंधारात पोळी बनवितात. जी छोटी असतात. ती पोळी अंधारात कट करून पेटीत भरून दुसऱ्या जागी त्यांचे पुनर्वसन केले जाते. सकाळी माशा नवीन ठिकाणी कामाला सुरूवात करतात. यासाठी इको फ्रेंडली तंत्र वापरले जात असल्याचे अमित गोडसे याने सांगितले.