बारामती: जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३६ वे वर्ष आहे. यंदा कोरोना महामारीमुळे वारीचे स्वरूप वेगळे आहे. पण आपल्या मनाच्या गाभाऱ्यातील पांडुरंगाला स्मरून यावषीर्ची पंढरीची वारी साजरी करण्याचा संकल्प फेसबुक दिंंडीच्या वतीने करण्यात आला आहे.
यावर्षी या दिंडीच्या वतीने 'आधार वारी' चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत कोरोना काळात ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना आपण आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आधार देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
यंदा फेसबुक दिंडी आणि आम्ही वारकरी (एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आधार वारी’हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा फेसबुक दिंडी चे ११ वे वर्ष आहे. फेसबुक दिंडी नेहमीच पालखी सोहळ्याचे फोटो आणि व्हीडीओ अपडेट्स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून वारकऱ्यांसाठी वारीच्या प्रत्यक्ष अनुभूती सोबत एक सामाजिक उपक्रम घेऊन येते.
दरवर्षी दिंडीच्या माध्यमातून जलसंधारण मोहीम, वारी ‘ती’ ची, नेत्रवारी,देह पंढरी - अवयव दान मोहीम, आठवणीतील वारी हे उपक्रम राबवले जातात. यावर्षी 'आधार वारी' उपक्रम राबविण्यात येणार आहे.