लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर, ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक उल्हास कशाळकर, तालयोगी सुरेश तळवलकर यांसारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या तालसुरांच्या मैफलीबरोबरच युवा कलाकारांचा युवोन्मेष अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. शुक्रवार, दि. १९ ते रविवार, दि.२१ मे दरम्यान यंदाचा १२वा पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव कोथरूड येथील यशवंतरावर चव्हाण नाट्यगृहात होत आहे. कार्यक्रमाचे संयोजक शौनक अभिषेकी यांनी ही माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. वसंत मराठे, महेश पानसे या वेळी उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्या नंतर ‘नाट्यरजनी’ हा नाट्य संगीत आणि भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल. प्रसिद्ध नाट्यसंगीत गायक सुरेश बापट, गायिका केतकी माटेगावकर, मुग्धा वैशंपायन, मीनल दातार यात सहभागी होणार आहेत. निवेदक मिलिंद कुलकर्णी सांगीतिक प्रवास रसिकांना उलगडून दाखवतील.राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने युवोन्मेष कार्यक्रमांतर्गत युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या अंतर्गत शनिवार, दि. २० मे रोजी सकाळी ९ वाजता राधिका ताम्हणकर यांचे गायन होणार असून, मुंबईतील चिंतन कट्टी यांचे सतार वादन, तर नांदेड येथील अभिजित आपस्तम्ब या कलाकाराचे सादरीकरण होईल. याच दिवशी सायंकाळच्या सत्रात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य सुधाकर देवळे यांचे गायन, क्षितिजा बर्वे यांचे भरतनाट्यम सादरीकरण होईल. प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या गायनाने या सत्राचा समारोप होईल. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता सत्यजित बेडेकर यांचे गायन, आळंदीतील सोहम गोऱ्हाणे यांचे तबला वादन आणि आरती कुंडलकर यांचे गायन या वेळी होईल. पंडित अभिषेकी बुवा यांचे शिष्य प्रसिद्ध गायक प्रभाकर कारेकर यांचे गायन, भजन सोपोरी यांचे संतूर वादन, उल्हास कशाळकर यांचे गायन आणि तालयोगी सुरेश तळवलकर यांचा तबला, अशी सांगीतिक मेजवाणी अखेरच्या सत्रात रसिकांना मिळेल. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे.
अभिषेकी महोत्सवात अनोखा स्वराविष्कार
By admin | Published: May 12, 2017 5:35 AM