प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : महात्मा गांधींचा ‘करून पाहा’चा मंत्र वाचनातून समजला. तर कष्टकऱ्यांकडून जगायचे कसे हे शिकता आले! यातूनच साकारले अनिता ठोंबरे यांचे ‘कॅशलेस दुकान’. या दुकानात ना ‘कॅश काऊंटर’ आहे ना कोणता व्यवहार. अगदी टूथपेस्टपासून लग्नासाठी लागणाऱ्या साड्या, रुखवतापर्यंत सर्व काही येथे मोफत उपलब्ध आहे. ‘खऱ्या’ गरीब, गरजू लोकांच्या सेवेत हे दुकान अगदी २४ तास सज्ज आहे. ठोंबरे यांच्या अनोख्या समाजकार्याला अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीच्या हातांचा ‘परिसस्पर्श’ झाला आहे. गेल्या २० वर्षांपासून हा यज्ञ अखंड सुरू आहे.
एखाद्या कष्टकरी महिलेला आपल्या घरात मिक्सर असावा, असे वाटते. एखाद्या कुटुंबाकडे मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसतात. लहान मुलाकडे शाळेत जाण्यासाठी गणवेश नसतो. तर एखादीचे लग्न पैशांमुळे खोळंबते. या प्रत्येक समस्येवरचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ठोंबरे करतात. कोरोना काळात देवदूताप्रमाणे त्या कष्टकरी वर्गाच्या मदतीसाठी उभ्या राहिल्या. काही मुलींना त्यांनी पौडच्या नर्सिंग कॉलेजात प्रवेश घेऊन दिला. त्यांच्या घरी एखाद्या मुलीचा कांदे पोह्यांचा कार्यक्रम पार पडतो. कंदील, मोदक, फराळ बनवण्याचे प्रशिक्षण वर्ग होतात. अगदी इंग्रजी शिकण्याचा वर्गही होतो.
“समाजासाठी काहीतरी करायचं हे नक्की होतं. यातून कष्टकरी वर्गाला शिकवायला सुरुवात केली, त्यांच्या अडचणी समजून घेऊ लागले. खरे गरजू लोक आणि त्यांच्या खऱ्या गरजा शोधून काढल्या आणि त्याप्रमाणे मदत करायला सुरुवात केली. दैनंदिन गरजेच्या वस्तू, किराणा मालापासून डॉक्टरची फी, शस्त्रक्रियेचे पैसे, लग्न-शिक्षणाचा खर्च, कपडे अशी जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न असतो. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचाही प्रयत्न आहे,” असे ठोंबरे यांनी सांगितले.
चौकट
उपकार नव्हे कृतज्ञता
“आपला समाज खूप दानशूर, प्रेमळ आहे. माझ्या कामाचे स्वरूप समजल्यावर आणि पटलावर महाराष्ट्रातून, इतर राज्यांतून, अगदी देशाबाहेरूनही मदतीचा ओघ सातत्याने सुरू असतो. सोशल मीडियाने लोकांपर्यंत पोहोचणं, संवाद साधणं सोपं केलं आहे. अगदी गरजूंच्या लसीकरणासाठीही मदतीची विचारणा होत आहे.” समाजातील ऐक्याची ताकद खूप मोठी आहे. लोक जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मदत करतात. कष्टकरी वर्गाच्या अडचणी अनंत आहेत. मात्र, ते कधीच हार मानत नाहीत. एक मार्ग बंद झाला तर दुसरा शोधतात, आत्महत्या करत नाहीत. मात्र, कोरोनाने त्यांना दहा पावलं मागे नेऊन ठेवले आहे. आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे. तीही उपकाराच्या भावनेतून नव्हे, तर कृतज्ञतेतून.”
-अनिता ठोंबरे
चौकट
बीएला पहिली आले आणि आई म्हणाली...
अनिता ठोंबरे म्हणाल्या, “मी बीएला कॉलेजमध्ये पहिली आले आणि खूप आनंद झालाय. अभिनंदनाचा वर्षाव झाला. दोन-तीन दिवस झाल्यावर आई मला म्हणाली, या यशाचे श्रेय कोणाला देशील? मी म्हणाले की, मी खूप अभ्यास केलाय. त्यामुळे मला स्वतःला, देवाला, पालकांना आणि गुरूंना! आई म्हणाली, जो शेतकरी ऊन-पावसात राबून धान्य पिकवतो आणि त्यामुळे तू जगू शकतेस त्याला श्रेय दे. स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारामुळे तुझं आरोग्य चांगलं राहतं, रस्ता बनवणाऱ्या माणसांमुळे तुझा मार्ग सुखकर होतो, बस चालकामुळे तुझा प्रवास चांगला होतो, गवंड्यामुळे तुझ्या डोक्यावर छत तयार झालं, सैनिकामुळे तू सुरक्षित आहेस. या सगळ्यांना तुझ्या यशाचं श्रेय दे. आयुष्यात त्यांच्यासाठी काहीतरी कर!” आईच्या या सल्ल्याने माझे डोळे खाडकन उघडले आणि आयुष्याची खरी दिशा मिळाली.”
चौकट
साड्यांची लायब्ररी
कष्टकरी महिलांना सणवारी विविधरंगी साड्या नेसण्याची हौस असते. यासाठी ठोंबरेंनी ‘साड्यांची लायब्ररी’ सुरू केली आहे. या लायब्ररीतून हव्या त्या सणाला हव्या त्या रंगाची साडी घेऊन जाता येते. वापरल्यावर धुवून, इस्त्री करून साडी पुन्हा लायब्ररीत विराजमान होते. ‘डोनेट अ कॉपी’ हा उपक्रमही त्यांनी सुरू केला आहे. गरजू कुटुंबातील मुलांसाठी प्रत्येकाला वह्या दान करता येऊ शकतात.