पुणे : देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर | जशी उसात हाे साखर तसा देहात हाे इश्वर | जसे दुधामध्ये लाेणी तसा देही चक्रपाणि | देव देहात देहात काे हाे जाता देवळात | तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना |संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. या अभंगातून प्रेरणा घेत पुण्यातील संजीव कुलकर्णी यांनी त्यांच्या घरात अनाेखा देखावा तयार केला आहे. या देखाव्यामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या देवाचा शाेध घेण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.
पुण्यातील 60 वर्षीय संजीव कुलकर्णी हे कुलकर्णी काका या नावाने प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्यांच्या घरात आकर्षक असे देखावे तयार करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी एटीएमचा देखावा तयार केला हाेता. ज्यात एटीएममधून प्रसाद मिळत असे. यंदा काहीतरी वेगळं करण्यासाठी आपल्यातील देव प्रत्येकाने ओळखावा हा संदेश त्यांनी तुकारामांच्या अभंगाचा आधार घेत दिला. या देखाव्यामध्ये त्यांनी एक वडाचे झाड साकारले असून त्यासमाेर एका व्यक्तीची प्रतिकृती तयार केली आहे. या प्रतिकृतीच्या ह्रदयामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचबराेबर ऊसामधून साखर कशी येते हेही त्यांनी यात दाखवले आहे.
गेल्या 6 महिन्यांपासून कुलकर्णी काका या देखाव्याची तयारी करत हाेते. या देखाव्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जात देखाव्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळवल्या. देखावा तयार करण्यासाठी त्यांना 15 हजार रुपयांचा खर्च आला. देखावा तयार करण्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी स्वाती कुलकर्णी त्यांच्या बहीण ललिता कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा सर्वेश कुलकर्णी यांनी माेलाची मदत केली.
या देखाव्याबाबत बाेलताना कुलकर्णी काका म्हणाले, आपल्या देहामध्ये देव आहे त्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज नाही. प्रत्येक माणसामध्ये आपण देव पाहायला हवा. हाच संदेश या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या देखाव्यासाठी मी तयारी करत हाेताे. अनेक अडचणी आल्या परंतु त्यांच्यावर मात करत हा देखावा तयार केला. देव आपल्यामध्येच समाविष्ट आहे. आपण त्याप्रमाणे वागायची गरज आहे.