पुणे - कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भाजपने समजूत काढत, त्यांचे राजकीय पुनर्वसन करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा मान दिला आहे. महाराष्ट्र राज्यातून असलेल्या एकमेव जागेसाठी कुलकर्णी यांची काही महिन्यांपूर्वी निवड करण्यात आली होती. त्यानंतर, आता मेधा कुलकर्णी यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. विशेष म्हणजे रक्षाबंधन सणानिमित्त त्यांनी मोदींना राखीही बांधली.
भाजपसाठी सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने, मेधा कुलकर्णी भलत्याच नाराज झाल्या होत्या. त्यानंतर पक्षाच्या कित्येक कार्यक्रमांना गैरहजर राहून त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. त्या पक्षाच्या कुठल्याच पदावरही कार्यरत राहिल्या नाहीत़. पण, दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:चा जनसंपर्क कायम ठेवला. कुलकर्णी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल असे सांगण्यातही आले.परंतु, हे आश्वासनही आश्वासनच राहिले. त्यानंतर, पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. कोविडमुळे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या नाहीत. पण, नुकतेच त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
भविष्यात मोठ्या संधींचे आश्वासन
पुणे महापालिकेत नगरसेवक राहिलेल्या व कोथरूडमधून सन २०१४ मध्ये आमदार झालेल्या कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यासाठी, सध्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. ही नियुक्ती करण्यापूर्वीच पक्षातील अन्य वरिष्ठांनीही त्यांची भेट घेऊन या पदाचा स्वीकार करावा, भविष्यात तुम्हाला मोठी संधी दिली जाईल, असा पुन्हा एकदा शब्द दिला असल्याचे समजते.