भूलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान व पुणे जिल्ह्यात शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भूलेश्वर मंदिरात गणरायाचे विविध रूपात दर्शन होते. या विविध रूपातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भूलेश्वर मंदिरास भेट देतात.श्रीक्षेत्र भूलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच गणपतीची विविध रूपे पाहावयास मिळतात. पुढच्या बाजूला असणाºया नगारखान्याच्या एका मनोºयात एक उभी असणारी गणपती मूर्ती दिसते. या मूर्तीच्या पोटाभोवती नागबंध आहे. ही मूर्ती चुनखडीमध्ये बनवलेली असून पेशव्यांचे गुरु ब्रम्हेंद्रस्वामी यांनी १७ व्या शतकात भूलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळेस या मूर्तीची स्थापना केली आहे. मंदिरावर असणाºया तिनही शिखरांवर गणेश मूर्ती वेगवेगळ्या आसनात आहेत व प्रत्येक मूर्तीच्या पोटाभोवती नागबंध आहे.पुढे आल्यानंतर, मंदिरातील दगडी जिना चढनू वर आल्यावर डाव्या बाजूला एका खांबावर एक गणेशमूर्ती दिसते. याचे वेगळेपण म्हणजे योगासन केल्याप्रमाणे डाव्या पायावर उभी असून उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर टेकवला आहे.दोन्ही हाताने उजव्या पायाचा गुडघा धरला आहे. याला शक्ती गणपती म्हणतात. भूलेश्वर गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर प्रदक्षिणा मार्गाकडे जाताना दक्षिण दरवाजाजवळ एका खांबावर एक गणेश मूर्ती दोन्ही हात व पाठ छताला लावलेली दिसते.दिवसेंदिवस श्री क्षेत्र भूलेश्वर देवस्थानकडे भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. पूर्वीच्या काळापासून येथील गणेश मूर्तींच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. येथील गणेश मूर्ती वेगवेगळ्या रूपात आढळतात. विशेष म्हणजे, स्त्री रुपातील गणेशदर्शन फक्त याच ठिकाणी घेता येते. यामुळे गणेश उत्सव काळात हजारो भाविक येथील गणेश मूर्तीचे दर्शन घेतात. - अरुण यादव, अध्यक्ष,श्री क्षेत्र भूलेश्वर देवस्थानप्रदक्षिणा मार्गावर मकर तोरणे दिसतात. सप्तमातृकांच्या मुर्ती दिसतात. गणेशाचे स्त्री रुपसुद्धा पाहावयास मिळते. ही मूर्ती पद्मासन घालून आसनस्थ व चतुर्भुज आहे. खाली मूषक वाहन आहे. ब्रह्मा, विष्णू, महादेव, कार्तिकेय अशा विविध देवतांच्या सुद्धा स्त्रीरूपातील मूर्ती आढळतात. देवी सहस्त्र नामावलीमध्ये विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी असा नामोल्लेख आढळतो. तर शिल्परत्न ग्रंथात शक्ती गणपतीचा उल्लेख आढळतो.
भूलेश्वर मंदिरात गणरायाचे आगळेवेगळे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 2:24 AM