लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालात त्रृटी असल्याचे समोर आले होते. त्यावर येत्या ३ डिसेंबरपर्यंत सुधारित निकाल जाहीर केला जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल मंगळवारी (दि. १) प्रसिद्ध केला आहे.
पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातील अंतिम वर्षाच्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. परंतु, परीक्षा देऊनही काही विद्यार्थ्यांची अनुपस्थिती लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालावर आक्षेप घेतला. त्यामुळे निकालात चूक झाली असल्याचे वाटत विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाने तक्रारी स्वीकारल्या.
विद्यापीठाकडे सुमारे ५ ते ६ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील २ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलवर पाठविण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले की, ऑनलाइन परीक्षा देताना अनेक चुका केल्या आहेत. सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना विषयच निवडलेले नाही. तर २७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जात भरलेला विषय सोडून दुसऱ्याच विषयाची परीक्षा दिली आहे.त्याचप्रमाणे ३७२ विद्यार्थ्यांनी स्वतः च्या ई-मेल आयडी वर परीक्षा देता दुस-याच्या ई-मेल आयडीवरून परीक्षा दिली आहे. विद्यापीठाने २ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर केला असून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.