लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्रथम ते अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग व श्रेणी सुधार परीक्षा येत्या ८ डिसेंबरपासून केवळ ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणार आहेत. तसेच यावेळी परीक्षेसाठी प्रॉक्टर्ड पध्दतीचा वापर करणार आहे. पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे २ लाख १८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे प्रथम ते अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधार परीक्षा येत्या ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत घेतल्या जात आहेत. सर्व विषयांची परीक्षा एमसीक्यू स्वरुपाची असणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी दिला असून परीक्षेचा सराव करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तीनही जिल्ह्यातील सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेचा सराव केला आहे.
विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी निकालात तृटी राहिल्याबाबत विद्यापीठाकडे तक्रार केली. त्यामुळे या पुढील परीक्षा घेताना अडचणी येऊ नयेत,या दृष्टीने विद्यापीठाने आवश्यक तयारी केली आहे. त्यात एका दिवशी ५० हजारांपेक्षा कमी विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे, एका दिवसात केवळ १०० ते १२० विषयांचीच परीक्षा घेणे आदी गोष्टींची विचार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉग इन करताना आणि परीक्षा एजन्सीला परीक्षा घेताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत,असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
परीक्षा पारदर्शक वातावरणात होतील आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही,यासाठी येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेणार आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फ्रंट कॅमेरा असणाऱ्या इल्क्टॉनिक साधनांचा वापर करावा लागेल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे फोटो काढले जातील. त्यात विद्यार्थ्याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यास फोटोंची सखोल तपासून करून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई केली जाणार आहे.