पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आईच्याच प्रेरणेतून स्वराज्याचे तोरण उभारले, साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहून इतिहास रचला. तसेच विनोबा भावे यांनीदेखील आईची महती विषद केली आहे. निर्गुण निराकार आणि सगुण साकार म्हणजे आई. आई नावाचे सर्वोत्तम विद्यापीठ घराघरांतून हरवले असून ते पुन्हा प्रस्थापित झाले पाहिजे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्य़ाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा आदर्श आई पुरस्कार रविवारी पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सतीश देसाई यांच्या मातोश्री ९६ वर्षीय स्वातंत्र्यसेनानी उषा देसाई यांना प्रतिभा शाहू-मोडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, सतीश देसाई उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, अनेकदा आई म्हणून, कुटुंबातील एक स्त्री म्हणून केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित असलेल्या जबाबदाऱ्या उषाताईंनी निभावल्याच परंतु, त्याही पुढे जाऊन त्यांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्र ह्या तीनही पातळ्यांवर यथार्थपणे जबाबदाऱ्या निभावल्या. स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्राकरता सक्रिय सहभाग घेण्याची उषाताईंना संधी मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी सोन्यात रूपांतर केले. शिक्षण संस्थांचे मूल्यमापन त्या संस्थेने किती कर्तबगार विद्यार्थी घडवले या परिमाणावर केले जाते, त्याच पद्धतीने आईने समाज आणि राष्ट्रा करता कसे कर्तृत्वसंपन्न सुपूत्र तयार केले, यावरही आईचे मोठेपण सिद्ध होते. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ ह्यात जमीन-आस्मानाचा फरक पडला असून स्वातंत्र्योत्तर काळात मूल्यव्यवस्था बदलून गेल्या आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे स्वतःचेच आई वडील सांभाळायला कायदे करावे लागत आहेत. लौकिक अर्थाने आपण प्रगती केलीही असेल मात्र, मूल्यव्यवस्थेच्या पातळीवर आपण नक्कीच अधोगती गाठली आहे.
प्रतिभा शाहू-मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. उषा देसाई यांनी स्वातंत्र्यलढ्यातील रम्य आठवणींना उजाळा दिला. कवी उद्धव कानडे यांनी मानपत्राचे वाचन केले. सिद्धार्थ देसाई यांनी आभार मानले.