पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभात अधिक चांगल्या दर्जाचे पदवी प्रमाणपत्रात (डिग्री सर्टिफिकेट) देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पदवी प्रमाणपत्राप्रमाणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना एफोर साईजमधील मराठी व इंग्रजी भाषेतील पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पदवी प्रदान समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.मागील वर्षी पदवी प्रदान समारंभात निकृष्ट दर्जाचे पदवी प्रमाणपत्र देण्यात आले होते. तसेच पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यापीठात आलेल्या काही विद्यार्थ्यांना उशिरापर्यंत रांगेत उभे राहावे लागले होते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण महाविद्यालयात आणि पदव्युत्तर पदवी व एम. फिल., पीएच. डी.चे पदवी प्रदानपत्र विद्यापीठात देण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाने पदवी प्रदान समारंभ कोणत्या पद्धतीने आयोजित करावा, याबाबतची नियमावलीही प्रसिद्ध केली. परंतु, शहरातील व मोठ्या संस्थांच्या महाविद्यालयांना महाविद्यालय स्तरावर पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करता येईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाच्या नियमावलीप्रमाणे हा समारंभ आयोजिता येणार नाही. ग्रामीण व शहरी भागातील प्राचार्यांकडूनही विद्यापीठाकडे याबाबत तक्रार केली जात आहे.एकाच संस्थेच्या दहा ते बारा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ एकाच ठिकाणी आयोजिण्यास परवानगी द्यावी. तसेच लहान संस्था असल्यास दोनपेक्षा अधिक संस्थांनी एकत्रितपणे पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करावे, असे प्रस्ताव विद्यापीठाकडे ठेवण्यात आले आहेत. विद्यापीठाकडून याबाबतचा आढावा घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आयआयटीच्या धर्तीवर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2016 2:07 AM