विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यंदा ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र, या वर्षापासून २० गुणांच्या प्रश्नांची उत्तरे कागदावर लिहून ती अपलोड करावी लागणार आहे. याबाबत पूर्वीपासून विद्यापीठाबरोबर ऑनलाईन परीक्षेचे कामकाज करत असलेल्या एजन्सीबरोबर चर्चा केली सुरू आहे.
विद्यापीठातर्फे १५ मार्चपासून परीक्षा सुरू होणार असली तरी परीक्षा कोणत्या एजन्सीमार्फत घ्यावी, याबाबत अद्याप विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठात परीक्षेसाठी एजन्सी नेमण्यावरून राजकारण सुरू आहे का? तसेच यामुळेच परीक्षेविषयक नियमावली प्रसिद्ध करण्यास उशीर होत आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
---
परीक्षेचे काम कसे होणार?
विद्यापीठाने परीक्षेसाठी दुसरी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतल्यास विद्यापीठ प्रशासनाला येत्या १५ मार्चपासून परीक्षा सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे परीक्षेचे काम जुन्याच एजन्सीच्या सहयोगाने होणार की नव्या एजन्सीला परीक्षेचे काम देणार हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे.