पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने याबाबतची सविस्तर नियमावली प्रसिद्ध केली असून त्यात रविवारीसुद्धा परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ मार्चपासून घेतल्या जाणार होत्या. मात्र, एजन्सी निवडण्याची प्रक्रिया चुकल्याने विद्यापीठावर परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली. आता विद्यापीठाच्या कंपनीतर्फे ऑनलाइन पद्धतीने परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. मात्र, काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर आयोजित कराव्यात, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड.,एम.पी.एड, बीएस्सी-बी.एड., बी.ए-बी.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ७० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत.
प्रथम वर्ष ते अंतिम वषार्तील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांच्या बाबतीत आवश्यक ती सर्व माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ई-मेलद्वारे अवगत करून दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. तसेच यापूर्वी सोडवलेली उत्तरे ही सेव्ह होऊन खंड पडल्यास तिथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. त्याचप्रमाणे परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाईल. साधारणपणे येत्या ७ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना मॉक टेस्टच्या माध्यमातून परीक्षेचा सराव करता येईल.
--
विद्यापीठाची परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. त्यात ५० गुणांच्या बहुपर्यायी प्रश्नांसाठी ६० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बहुपयार्यी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना छायांकित प्रत किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.
--
ज्या महाविद्यालयांकडून ज्या विद्यार्थ्यांचे इन सेमिस्टर, ऑनलाइन व सेशनल परीक्षांचे अंतर्गत गुण दिनांक १० एप्रिलपर्यंत विद्यापीठास प्राप्त होतील. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल फक्त ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येतील. तसेच गुणपत्रके मार्च/एप्रिल २०२१ च्या परीक्षांचे निकालाबरोबरच एकत्रित वितरित करण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले आहे.