पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा येत्या १५ मार्चपासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले. परंतु, परीक्षा जुन्या एजन्सीच्या सहकार्याने घेणार की नवीन एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणार याबाबत अद्याप विद्यापीठाचे एकमत झाले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यास एप्रिल उजाडणार आहे.
कोरोनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला. मात्र, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने दिलेल्या मार्गदर्शनावर १५ मार्चपासून परीक्षा घेण्याचे जाहीर केले. विद्यापीठाने यापूर्वी परीक्षेसाठी निवडलेल्या एजन्सीबरोबर एक वर्षाचा करार केला. त्यामुळे परीक्षा विभागाने जुन्या एजन्सीबरोबर पुढील परीक्षेसंदर्भात नियोजन सुरू केले. मात्र, जुन्या एजन्सीला काम देता येणार नाही. नवीन एजन्सी निवडण्याची पक्रिया पूर्ण करावी लागेल, अशी चर्चा नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाली. त्यामुळे १५ मार्चपासून परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, विद्यापीठाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाने हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी अधिसभा सदस्य व विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
----
परीक्षेचे काम कोणत्या एजन्सीला द्यावे याबाबत अद्याप परचेस कमिटीमध्ये निर्णय झालेला नाही. एजन्सी निवडीची प्रक्रिया नियमाप्रमाणे करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला एजन्सी निवडीसाठी नव्याने निविदा काढावी लागेल.
- राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--
विद्यापीठाला जुन्या एजन्सीला परीक्षेचे काम देता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने खर्च करून स्थापन केलेल्या दोन कंपन्यांना परीक्षेचे काम द्यावे. जर या कंपन्या परीक्षा घेण्यास सक्षम नसतील तर त्यांच्या उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, परीक्षा लवकर घेण्यासाठी तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
- संतोष ढोरे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ