पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार आता वर्षातून दोन वेळा पदवीप्रदान समारंभ पार पडत आहेत. यंदाच्या वर्षातला दुसरा पदवीदान समारंभ येत्या ११ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. आॅक्टोबर नोव्हेंबरमधील झालेल्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात पदवी, पदव्युत्तर, एम. फिल, पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रांची संख्या साधारणपणे सात हजार इतकी आहे. विद्यापीठाबरोबरच महाविद्यालय पातळीवरही पदवीदान समारंभ आयोजिण्यात येत आहेत. मात्र यंदाच्या पदवीदान समारंभामध्ये वाटप करावयाच्या प्रमाणपत्रांची संख्या केवळ ७ हजार इतकी आहे. त्यामुळे पदवीस्तरावरील प्रमाणपत्रांचे वाटप करणे महाविद्यालयांना सोयीस्कर तसेच संयुक्तिक ठरणार नसल्यामुळे केवळ विद्यापीठामध्ये हा समारंभ घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पदवीदान समारंभ हा दरवेळेस सकाळी ११ वाजता आयोजित केला जात होता, मात्र उन्हाची तीव्रता जास्त असल्याने यंदा सायंकाळी साडेपाच वाजता पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. जे विद्यार्थी या समारंभाला उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांना टपालाद्वारे घरपोच प्रमाणपत्र पाठविण्यात येतील, असेही परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा ११ मे रोजी
By admin | Published: May 04, 2017 2:46 AM