पुणे : देशात पीएच.डी. पदवी संपादन करणाऱ्यांची सर्वाधिक आहे. मात्र या पीएच.डीमधून होणारे संशोधन हा चिंतेचा विषय आहे. केवळ पदोन्नती मिळविण्यासाठी प्राध्यापकांकडून पीएच.डीच्या पदव्या मिळविल्या जात आहेत. सर्जनशीलता आणि नवनिर्मिती याचे दर्शन संशोधनातून घडले पाहिजे अशा प्रकारच्या गुणवत्तापूर्ण संशोधनाची मानसिकता निर्माण करण्याचे मोठे आव्हान विद्यापीठांसमोर आहे असे मत केंद्रीय मानव संसाधन विकास (उच्च शिक्षण) राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या १९ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापते तसेच सर्व विद्या शाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन आणि विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते. या समारंभात ७३३८ विद्यार्थ्यांना पदवी, ९० विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि ५० विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले, ‘‘देशात ८ हजार ६४ विद्यापीठे आहेत, या विद्यापीठांमधून मोठयाप्रमाणात पीएच.डी घेऊन विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र त्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. देशातील अनेक महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये आयोजित विविध विषयांवरील कार्यशाळांची मला निमंत्रणे येतात. या कार्यशाळांमध्ये सादर होणाऱ्या शोधनिबंधांचा दर्जा अत्यंत सुमार असतो, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय कार्यशाळा असे नाव दिले जाते. याबाबत कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत मी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर असे प्रकार कमी होऊ लागले आहेत. विद्यापीठात होणारे संशोधन प्रयोगशाळांमध्येच मर्यादित न राहता ते समाजापर्यंत पोहचले पाहिजे. आज इच्छा असूनही अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. उच्च शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी विद्यापीठांनी पय्रत्न केले पाहिजेत.’’ माणिकराव साळुंखे म्हणाले, ‘‘एनआरएफ रँकिंगमध्ये भारती विद्यापीठाची ८ महाविद्यालये अव्वल ठरली आहेत. भारती विद्यापीठाला ६६ वी रँक मिळाली आहे. त्याचबरोबर नॅक मुल्यांकनामध्ये ए प्लस मिळाले आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टिने अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.’’ शिवाजीराव कदम यांनी यावेळी विचार मांडले. प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कुलसचिव जी. जयकुमार यांनी आभार मानले.
विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज : सत्यपाल सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:59 PM
कार्यशाळांमध्ये सादर होणाऱ्या शोधनिबंधांचा दर्जा अत्यंत सुमार असतो, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय कार्यशाळा असे नाव दिले जाते...
ठळक मुद्दे७३३८ विद्यार्थ्यांना पदवी, ९० विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि ५० विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान आज इच्छा असूनही अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचित