पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिध्द करण्यात आला असला, तरी विधि विषयाच्या विद्यार्थ्यांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, येत्या मंगळवारी विधि विषयाच्या विद्यार्थ्यांचा निकाल प्रसिध्द केला जाणार आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रातील ५ हजार ३३३ जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विद्यापीठातर्फे ५ सप्टेंबरला ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस १५ हजार ५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ३०० तर ७ हजार ५३९ अशा एकूण १३ हजार ८४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल ८ ऑगस्टला जाहीर करण्यात आला असून एकूण निकाल ६४.९७ टक्के लागला आहे.
विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, विधि विषयासाठी २५० प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. काही विद्यार्थ्यांनी १०० तर काही विद्यार्थ्यांनी २५० प्रश्न सोडवले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करावा, याबाबत प्रश्न निर्माण झाला. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यावर मार्ग काढला असून मंगळवारी निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
-------------------------------
पीएच.डी. प्रवेशाची आकडेवारी
विद्यार्थ्यांची माहिती. मुले. मुली एकूण
पात्र अर्ज ६,८६५ ८,१८४ १५,०५०
परीक्षा देणारे विद्यार्थी ६,३०० ७,५३९ १३,८४०
अपात्र विद्यार्थी २,१७४ २,६७२ ४,८४७
गैरहजर विद्यार्थी ५६५ ६४५ १,२१०
पात्र विद्यार्थी ४,१२६ ४,८६७ ८,९९३
--------------------------