पुणे : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चाचपणी सुरू केली आहे. विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पध्दतीचा वापर करून यशस्वीपणे आॅनलाईन प्रवेश परीक्षा घेतल्या आहेत. याच पध्दतीचा वापर करून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाकडून पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते. परीक्षांचे नियोजन करताना इतर पर्यायांचाही विचार केला जाईल, असे स्पष्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र, युजीसीने घालून दिलेले ३० सप्टेंबरचे बंधन न्यायालयाने ठेवलेले नाही. या निकालामुळे राज्यात परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. त्यादृष्टीने विद्यापिठाने यापुर्वीच तयारी केली आहे. पण सध्याच्या कोरोनाची स्थिती बिकट असल्याने विविध पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. याबाबत डॉ. करमळकर यांनी परीक्षांच्या नियोजनाबाबत माहिती दिली. विद्यापीठाकडून यापुर्वी परीक्षा घेण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे पुन्हा ठराव करावा लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.विद्यापीठाकडून आधीपासून परीक्षांची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेण्यात आल्या आहेत. या परीक्षांना सुमारे १ हजार ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यामध्ये काहीही अडचणी आल्या नाहीत. अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठीही या पध्दतीचा वापर करण्यास पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊनच परीक्षांच्या वेळा निश्चित केल्या जातील. किमान दीड महिन्यांचा कालावधी असेल. आॅनलाईनप्रमाणेच अन्य पर्यायांचाही विचार केला जाईल. त्यानुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरेल, असे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले. ----------------शाखानिहाय अंतिम वर्षातील परीक्षार्थीकला - ३५ हजार १६७शिक्षण शास्त्र - ६ हजार २३२विज्ञान -४० हजार ३५४विधी -७ हजार २२५वाणिज्य- ६६ हजार ८६३व्यवस्थापनशास्त्र -१४ हजार ९०६औषधनिर्माणशास्त्र - ५ हजार २०९अभियांत्रिकी - ४८ हजार १३६आर्किटेक्चर - १ हजार ३७२------------------------------प्रॉक्टर्ड परीक्षा पध्दतीमध्ये एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षा देता येते. यामध्ये परीक्षेची वेळ निश्चित असते. विद्यार्थ्यांची ओळख पटवता येते. परीक्षा केंद्राप्रमाणे इथेही विद्यार्थ्यांवर परीक्षेदरम्यान लक्ष ठेवता येते. विद्यापीठाने याच पध्दतीने यशस्वीपणे यंदा प्रवेश परीक्षा घेतल्या आहेत. ------------सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थीपुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी अंतिम वर्षातील आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन विद्यापीठाला करावे लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६६ हजार विद्यार्थी वाणिज्य शाखेतील तर ४८ हजार अभियांत्रिकी शाखेचे आहेत. विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ४० हजार व ३५ हजार एवढी आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आॅनलाईनला परीक्षेला प्राधान्य? कुलगुरूंचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 12:28 PM