पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते औषधी वनस्पती रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यापीठात औषधी वनस्पतींच्या लागवडीस प्रारंभ करण्यात आला. औषधी वनस्पती सुविधा केंद्राने विविध औषधी वनस्पतींची तीन लाख रोपे तयार केली आहेत. या रोपांचे वाटप जुलै महिन्यात सुरू होईल.
विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ व आयुष मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राच्या वतीने महाराष्ट्र, गुजरात, गोवा व राजस्थान या राज्यांमध्ये होणाऱ्या औषधी वनस्पतींच्या लागवडीस यावेळी प्रारंभ केला.विद्यापीठाच्या औषधी वनस्पती बागेत दशमुळातील उपयुक्त अग्निमंथ, टेटू, शयोनक, बेल आदी वृक्षांची शेतकरी, प्राध्यापक, नागरिक व आयुर्वेदातील डॉक्टर यांच्या उपस्थितीत लागवड करण्यात आली.
ज्या शेतकरी बांधवांना या औषधी वनस्पतींची लागवड करायची आहे; त्यांनी केंद्राकडे मागणी नोंदवावी,असे आवाहन पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे प्रमुख संशोधक व विभागीय संचालक डॉ. दिगंबर मोकाट यांनी केले. या कार्यक्रमास वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश अडे, प्रा. मिलिंद सरदेसाई, प्रा. डॉ. गिरीश टिल्लू उपस्थित होते.
------