पुणे : अायुष्यातील सगळं संपलं असं वाटत असताना पाटील इस्टेट येथील अागीत गुणपत्रिका जळालेल्या विक्रम कांबळे या विद्यार्थ्याच्या अायुष्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक अाशेचा किरण घेऊन अाले. विद्यापीठाकडून विक्रमला बाेलावून घेत अागीत जळालेली सर्व प्रमाणपत्रे तयार करुन देण्यात अाली. स्वतः कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर यांच्या हस्ते ही प्रमाणपत्रे विक्रमला सुपूर्त करण्यात अाली. ही प्रमाणपत्रे मिळताच विक्रमला गहिवरुन अाले.
28 नाेव्हेंबरला पुण्यातील पाटील इस्टेट झाेपडपट्टीला भीषण अाग लागली. या अागीत अनेक झाेपड्या जळून खाक झाल्या. क्षणार्धात अनेकांचे संसार रस्त्यावर अाले. मुळचा अकलूजचा असणारा अाणि सध्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पाटील इस्टेट झाेपडपट्टीत अाजीकडे राहणाऱ्या विक्रम कांबळे या विद्यार्थ्याची संपूर्ण प्रमाणपत्रके व गुणपत्रके जळून खाक झाली. त्यामुळे पुढील परीक्षा कशा द्यायच्या असा प्रश्न विक्रम समाेर उभा ठाकला हाेता. विक्रमची ही कहाणी विद्यापीठाला समजताच कुलगुरु अाणि विद्यापीठ प्रशासनाने विक्रमची विद्यापीठाशी संबंधित सर्व गुणपत्रके व पासिंग सर्टिफिकेट स्वतःहून तयार केले. कुलगुरुंनी विक्रमला स्वतःहून सहकार्य करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना केल्या. परीक्षा विभागाचे संचालक डाॅ. अशाेक चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने विक्रम याची विद्यापीठाशी संबंधित सर्व कागदपत्रे तयार केली. त्यात विक्रम याच्या वाणिज्य शाखेच्या गुणपत्रकांचा समाेवश अाहे.
कुलगुरु म्हणाले, विक्रम कांबळे याची प्रमाणपत्रे अागीत जळाल्याने ताे निराश हाेता. अशा अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्याला मदत करणे हे विद्यापीठाचे कर्तव्यच अाहे. त्याच भावनेतून विक्रम याला स्वतःहून मदत केली. त्याने अभ्यास करुन स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे अाणि उत्तम करियर घडवावे, यासाठी शुभेच्छा. विक्रम म्हणाला, विद्यापीठाने अापणहून फाेन करुन मला बाेलावून घेतले अाणि विद्यापीठाच्या परीक्षांची गुणपत्रके हाती दिली. त्यामुळे मला खूप अानंद झाला अाहे. कुलगरुंचा अाणि विद्यापीठाचा मी अाभारी अाहे.