लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशभरातील विद्यापीठांमध्ये दहाव्या क्रमांकावर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जगभरातील विद्यापीठांमध्ये ८००वा क्रमांक लागला आहे. या रँकिंगमध्ये आयआयटींनी चांगले स्थान मिळविले असून आयआयटी दिल्ली, बॉम्बे, बेंगलोर यांना पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्यावतीने जगभरातील विद्यापीठांचे मूल्यांकन करून गुरुवारी त्यांचे रँकिंग जाहीर करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ८०० ते १००० दरम्यानचा रँक देण्यात आला आहे. या यादीनुसार देशभरातील विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ १३ व्या स्थानावर आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून मात्र या रँकिंग निश्चित करण्याच्या प्रक्रियेत विद्यापीठाकडून कोणताही अधिकृत सहभाग नोंदविण्यात आला नव्हता. तसेच रँकिंग जाहीर करणाऱ्या संस्थेकडून देण्यात आलेली माहिती व प्रत्यक्ष माहिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.मागील वर्षी द टाइम्स हायर एज्युकेशनच्यावतीने जगभरातील विद्यापीठांचे मूल्यांकन केले असता पुणे विद्यापीठ ६०० ते ८०० दरम्यानच्या रँकवर होते. देशभरातील विद्यापीठांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागत होता. मात्र क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठाचा जगभरात ८०० ते १००० व्या रँकवर आहे, देशातून १३ व्या क्रमांकावर आहे.शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, विद्यार्थी व शिक्षक संख्या, सायटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संख्या आदी निकषांच्या आधारे हे रँकिंग जाहीर केल्याचे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये आयआयटी दिल्ली (१७२ रँक), आयआयटी बॉम्बे (१७९ रँक), आयआयटी बेंगलोर (१९० रँक), आयआयटी कानपूर (२९३ रँक), आयआयटी खरगपूर (३०८ रँक) असा क्रमांक लागतो. दिल्ली विद्यापीठ (४८१-४९० रँक), जाधवपूर विद्यापीठ (६०१-६५० रँक), हैदराबाद विद्यापीठ (६०१-६५० रँक), मणिपाल विद्यापीठ (७०१-७५० रँक), कोलकाता विद्यापीठ (७५१-८०० रँक) आदी विद्यापीठे पुढे आहेत.>रँकिंग प्रक्रियेतील माहितीमध्ये विसंगती‘‘क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंगच्या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहभागी झाले नव्हते. त्यांनी परस्पर माहितीच्या आधारे रँकिंग जाहीर केले आहे. त्यांनी दिलेली माहिती व प्रत्यक्षातील माहिती यामध्ये मोठी तफावत आहे.’’ - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
वर्ल्ड रँकिंगमध्ये विद्यापीठ पिछाडीवर
By admin | Published: June 09, 2017 12:47 AM