पुणे : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुरस्कारावर यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपला ठसा उमटवला असून तब्बल पाच पुरस्कार पटकावले आहेत. त्यात सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयकाचा तसेच सर्वोत्तम कार्यक्रम अधिकारी या पुरस्कारांचा समावेश आहे. निस्वार्थ भावनेने काम केलेल्या पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची सुध्दा पुरस्कारासाठी निवड केली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन मिळावे. तसेच निस्वार्थ भावनेतून केलेल्या सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे विविध पुरस्कार दिले जातात. यंदा सर्वोत्कृष्ठ विद्यापीठ पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून पुणे विद्यापीठाचे समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई यांची निवड झाली आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कासाठी विद्यापीठाशी संलग्न नाशिक जिल्ह्यातील कर्मवीर शांतारामबापू कोंडोजी वावरे महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी रवींद्र अहिरे यांची निवड केली आहे. तसेच अहिरे यांच्या वावरे महाविद्यालयाचीच सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील मनोज गुंजाळ या विद्यार्थ्याची सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कारासाठी निवड केली आहे.