पुणे: काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे.परिणामी पुढील काळात निवडणुकांच्या वातावरणामुळे राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रही ढवळून निघणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने येत्या १२ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेली अधिसभेची बैठक पुढे ढकलावी,अशी मागणी विद्यापीठाच्या सुमारे निम्म्या अधिसभा सदस्यांनी केली आहे.विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत उच्च शिक्षणाची ध्येय धोरणे निश्चित केली जातात. त्यामुळे या बैठकीस सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. परंतु,या कालावधीत काही प्राध्यापकांना निवडणुकिच्या कामासाठी नियुक्त केले जाते. तसेच अनेक अधिसभा सदस्य हे राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यामुळे १२ ऑक्टोबर रोजी अधिसभेच्या बैठकीस अनेक सदस्य उपस्थित राहू शकणार नाहीत. परिणामी बैठकीस आवश्यक असलेली गणसंख्या पूर्ण होणार नाही. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर साधक-बाधक चर्चा होणार नाही. ही बाब विचारात घेवून विद्यापीठाने अधिसभेची तारीख पुढे ढकलावी,या मागणीचे निवेदन ३२ अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे. विद्यापीठाने निवडणुका झाल्यानंतर अधिसभेची बैठक बोलवावी, अशी मागणी अधिसभा सदस्य संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, शशिकांत तिकोटे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणीस,राजेंद्र विखे, महेश आबळे, आशिष पेंडसे यांच्यासह ३२ सदस्यांनी केली आहे.
आचारसंहितेमुळे विद्यापीठाने अधिसभा पुढे ढकलावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:53 PM