पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात अज्ञात व्यक्तीने छेड काढल्याची घटना घडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडूनही छेड काढणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात अपयश आले. तसेच विद्यापीठात अजूनही आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत. त्यामुळे विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची आवश्यकता आहे.विद्यापीठातील विविध विभाग, शैक्षणिक संस्था आणि प्रवेशद्वारांची संख्या विचारात घेता विद्यापीठाकडे सुरक्षारक्षकांची संख्या कमी आहे. त्यातच विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाजवळच्या चौकातील एक सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठाने मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेच बसवले नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठातील काही विद्यार्थिनी सकाळी सहा वाजल्यापासूनच ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत काम करतात. मात्र, पहाटे अंधाराचा फायदा घेऊन ही मुलींची छेड काढली जाते. मुलींना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून व जयकर ग्रंथालयातून घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याचा लाभ विद्यापीठातील सर्व मुलींकडून घेतला जात नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील पोस्ट आॅफिसकडून मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या वळणावर एका मुलीच्या छेडछाडीची घटना घडली होती.विद्यापीठातील डाप्सा संघटनेचे अध्यक्ष अमोल सरोदे म्हणाले, की सकाळी सहा वाजता कमवा शिका योजनेच्या कामाला जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठात काही ठिकाणी बंद असलेले दिवे बसवावेत, अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)झाडींमध्ये चालतात पार्ट्या४विद्यापीठातील सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाली आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. परंतु, महाराष्ट्र गार्ड बोर्डकडून अद्याप सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिलेले नाहीत. विद्यापीठाच्या खडकी गेटमार्गे कोणीही प्रवेश करून विद्यापीठाच्या झाडींमध्ये जाऊन पार्ट्या करतात. त्यावर विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांना नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे विद्यापीठाला सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यास वाव असल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठ हवे सुरक्षित
By admin | Published: February 20, 2017 3:09 AM