अधिसभा सदस्य डॉ. पंकज मणियार यांनी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये दोन्ही परीक्षा एकदाच घेण्याबाबत ठराव मांडला होता. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. विद्यापीठाने १५ मार्चपासून परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून सुमारे दीड महिना परीक्षा चालणार आहे. परिणामी द्वितीय सत्र सुरू होण्यासाठी मे महिना उजाडणार असून दुस-या सत्राची परीक्षासुद्धा लांबणार आहे. पुणे विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या ३१ मेपर्यंत शैक्षणिक वर्ष संपणार आहे. त्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी सुरू होईल आणि द्वितीय सत्र पुन्हा तीन ते चार महिन्यांनंतर संपणार आहे.
विद्यापीठाने प्रथम सत्राची परीक्षा घेण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी घालण्यापेक्षा तत्काळ द्वितीय सत्राचे वर्ग सुरू करावेत. तसेच दोन्ही सत्रांचा अभ्यासक्रम एप्रिल-मे महिन्यात संपवून दोन्ही सत्राच्या परीक्षा एकदाच घ्याव्यात. त्यामुळे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करता येईल, अशी मागणी मणियार यांनी केली आहे.