पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधनकार्य चांगले असून विद्यापीठाने एखादे क्षेत्र निश्चित करून त्यातील संशोधन आणि नवसंशोधनासंबंधी प्रस्ताव सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाला द्यावा, त्यासाठी केंद्र सरकार निश्चितपणे आर्थिक मदत करील, असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी शनिवारी यांनी दिले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेसतर्फे आयोजित वेबिनारमध्ये शनिवारी नितीन गडकरी यांनी विद्यापीठाच्या स्टार्ट-अप्सशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. 'स्टार्ट -अप्स अँड स्मॉल एंटरप्राईजेस - फ्यूच्युरिस्टिक ईकोसिस्टीम पोस्ट पॅनडेमिक' या विषयावर इनक्यूबेशन सेंटरद्वारे वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
नितीन गडकरी म्हणाले, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एमएसएमई एक्सचेंजची स्थापना करीत आहे. ज्या उद्योगांची कामगिरी चांगली आहे, त्यांच्याकडून सरकार भाग घेईल, तसेच त्यांना शेअरच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देईल, ज्यामुळे उद्योजकांना उद्योगाच्या सुरूवातीच्या टप्प्यात मदत होईल. तसेच स्टार्टअप्सनी देशास आवश्यक असलेले उपक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे.त्यांनी अशा विशिष्ट स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर उपयुक्त गोष्टी तयार होतील, शिवाय त्यामुळे लोकांचे कामासाठी होणारे स्थलांतर कमी होईल.
गडकरी म्हणाले, ग्रामीण आणि महत्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी छोट्या व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे आणि शहरांच्या ठिकाणी तेथील गरजा लक्षात घेऊन त्यानुसार तेथील नियोजन करायला हवे. .....कोरोना महामारीच्या काळात विद्यापीठातर्फे कोव्हिड-१९ चे निदान करणाऱ्या प्रयोगशाळेच्या निर्मितीवर काम केले जात आहे. तसेच विद्यापीठाच्या स्टार्ट -अप द्वारे व्हेंटिलेटर तयार करण्यात आले असून त्याला आवश्यक ती मान्यता सुद्धा मिळाली आहे.- डॉ. नितीन करमळकर,कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ---------- छोट्या उद्योगधंद्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्या उद्योगांचे व्यावसायिकरण करता येईल अशा प्रकल्पांचे संशोधन विद्यापीठाकडून केले जाईल.- डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ........