पुणे : सत्यशोधक चळवळीतील शांताबाई बनकर यांनी १९३९ मध्ये लिहिलेले सावित्रीबाई फुले यांचे अल्पचरित्र विद्यापीठाने शोधून ते पुनर्प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, हे खरोखरच तळागाळापर्यंत जाऊन केलेलं काम आहे आणि आता विद्यापीठाने हे काम पुढे न्यावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इतिहास विभाग आणि महात्मा फुले अध्यासन यांच्या वतीने रविवारी महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांचे अल्पचरित्र या पुस्तकाबरोबरच ‘बेळगाव परिसरातील सत्यशोधक चळवळ’ आणि ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकांचे प्रकाशन केले. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमासाठी डॉ. बाबा आढाव यांच्यासह प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, मा. उत्तमराव पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर, महात्मा फुले अध्यासन प्रमुख प्रा. विश्वनाथ शिंदे, प्रा. राजा दीक्षित उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले, केवळ विद्यापीठाला नाव देऊन, पुतळे उभारून त्या व्यक्तीचे कार्य पुढे जात नाही तर ते विचारांच्या आदान प्रदानातून जाते. विद्यापीठाने सत्यशोधकांच्या कार्याचा मागोवा घेत हे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत.
नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, सावित्रीबाईंच्या या पुस्तकातील अनेक संदर्भ हे पुढील काळासाठी महत्त्वाचे मानले जातील. डॉ. एन. एस. उमराणी, उत्तमराव पाटील मनोगत व्यक्त केले.
--
विद्यापीठाने प्रसिद्ध केली पुस्तके ही सामाजिक ठेवा आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार व पुरोगामी चळवळ घराघरात पोहोचवण्याचं काम अशा संशोधनांच्या माध्यमातून विद्यापीठ करेल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ