पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नियुक्त केलेल्या समितीकडून दोन किंवा दोन पेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची तपासणी करून येत्या सोमवारी संबंधितांचा सुधारित निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाने निकालात दुरूस्ती करून द्यावी, या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन शनिवारी स्थगित करण्यात आले.
पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ॲानलाइन व ॲाफलाइन परीक्षा घेतल्या. मात्र,त्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या निकालातही त्रुटी असल्याचे समोर आले. एकाच विषयात हजारो विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळणे, परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखविणे, यामुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दोन वेळा सुधारित निकाल प्रसिध्द करण्यात आला. तरीही निकालात त्रुटी कायम होत्या. त्यामुळे निकाल दुरूस्त करून द्यावा, या मागणीसाठी युक्रांदतर्फे चार दिवसांपासून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. गेल्या चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर विद्यापीठ प्रशासनाने दखल घेऊन समिती नियुक्त केली.
युक्रांदचे शहराध्यक्ष सचिन पांडूळे म्हणाले, सोमवारी सुधारित निकाल जाहीर करण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिले असल्याने चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन शनिवारी स्थगित केले. निकाल दुरूस्ती झाली नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल.