महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिव व पेशवेकालीन मोडी लिपीतील दस्तऐवज पडून आहेत. मात्र, मोडी लिपीचे वाचन करणा-या अभ्यासकांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने हा अभ्यासक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. पहिल्याच दिवशी ४० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमास नोंदणी केली असून त्यात गोव्यातील विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमास नोंदणी करण्यासाठी येत्या २७ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण असणाऱ्या या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. शनिवार व रविवार वगळून दररोज सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.तसेच महिनाअखेरीस ऑनलाइन परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. डेक्कन कॉलेजमधील मोडी लिपीचे तज्ज्ञ डॉ. गिरीश मांडके हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्रा. बाबासाहेब दूधभाते म्हणाले, महाराष्ट्रात मोडी लिपीचे वाचन करणा-या अभ्यासकांची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रात वापरली जाणारी मोडी लिपी काळाच्या पडद्याआड जाऊ नये. महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून पडून असलेल्या कागदपत्रांमधील माहिती समोर यावी, या हेतूने विद्यापीठातर्फे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.