पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा येत्या १५ जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शनिवारी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दुसऱ्या सत्राची परीक्षासुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, विद्यापीठाने १५ मे पासूनच या परीक्षांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रथमतः कला, वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून सुरू करून इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्याबाबत परीक्षा मंडळाच्या बैठकीत एकमत झाले. तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणही महाविद्यालयांकडून स्वीकारण्याबाबत कालावधी निश्चित करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे शैक्षणिक व परीक्षेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच कोरोनामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महिन्यात होणारी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा कोरोनामुळे एप्रिल महिन्यापासून घ्यावी लागली. यंदा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशनच्या सहकार्याने ऑनलाइन परीक्षा योग्य पद्धतीने घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना फार तांत्रिक अडचणी आल्या नाहीत. विद्यापीठाला १० एप्रिलपासून प्रथम सत्रची परीक्षा ऑनलाइन व प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात यश आले. दुसऱ्या सत्राची परीक्षा सुद्धा याच पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
--------
प्रथम सत्राची परीक्षा संपत आली असून दुसऱ्या सत्रातील परीक्षाही लवकर घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यामुळे विद्यापीठाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षेचे नियोजन करण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार या परीक्षा येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहेत. परंतु, इतक्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होणार आहे का? तसेच दुसऱ्या सत्रातील सर्व अभ्यासक्रम १५ जूनपर्यंत पूर्ण करणे शक्य होणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
---------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण महाविद्यालयाकडून प्राप्त झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी येत्या १५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन त्यांचे गुण येत्या २५ जूनपर्यंत विद्यापीठाकडे जमा करावेत, असाही निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
- डॉ संजय चाकणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
................................