पुणो : विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात येणारे पुतळे हे विद्यापीठाने स्वखर्चातून उभारावेत, त्यासाठी अन्य संस्था-संघटनांना जागा देऊ नये किंवा त्यांची मदत घेऊ नये, असा निर्णय सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. याबरोबरच, सध्या उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे परीक्षण करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
व्यवस्थापन परिषदेची आज झालेली बैठक पुतळ्यांच्या विषयावरून गाजली. विद्यापीठाच्या आवारात यापूर्वी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यांच्या अनावरणाच्या कार्यक्रमांना राजकीय स्वरूप आले होते. या पाश्र्वभूमीवर, पक्ष-संघटनांची नाराजी टाळण्यासाठी व बाहेरील संघटनांचा विद्यापीठात वरचष्मा नको, यासाठी विद्यापीठानेच आता स्वखर्चाने पुतळे उभारण्याचा ठराव संमत केला.
काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचा चेहरा डॉ. आंबेडकरांच्या चेह:याशी मिळताजुळता नसल्याचा आक्षेप काही संघटनांनी घेतला होता. त्यावरून पुतळ्याच्या अनावरण समारंभात संघटनांनी गोंधळही घातला होता. त्यामुळे पुतळ्याचे परीक्षण करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. आक्षेपांमध्ये काही तथ्य आहे का, याचा आढावा ही समिती घेईल. छत्रपती संभाजीमहाराज आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे विद्यापीठात उभारावेत, असाही ठराव व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात आला. या प्रस्तावाची नोंद घेण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांच्या निवडीसाठी छाननी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. परीक्षा नियंत्रकपदासाठी 24 अर्ज आले आहेत. (प्रतिनिधी)