पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या ३० डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मागील प्रांगणात होणार असून, केंद्रीय मन्युष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार सर्व विद्यापीठांनी वर्षातून दोन वेळा पदवी प्रदान सोहळ्याचे आयोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाने येत्या ३० डिसेंबर रोजी पदवी प्रदान समारंभाचे आयोजन केले आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या तब्बल २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला होता. तर, पदवी अभ्यासक्रमाच्या ७६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र समारंभाला उपस्थित राहावे, अशी विनंती विद्यापीठातर्फे करण्यात आली होती. जावडेकर यांनी ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठाचा पदवी प्रदान ३० डिसेंबरला
By admin | Published: December 22, 2016 2:21 AM